मुंबई दि.२४(द नरिमन पॅाईंट)शासनाने ‘पद्म पुरस्कार २०२७’ साठी शिफारस करणाऱ्या राज्यस्तरीय समितीची घोषणा केली असून, या समितीच्या अध्यक्षपदी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील महत्त्वाच्या समितीचे नेतृत्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,केंद्र सरकारकडून दिला जाणारा ‘पद्म’ पुरस्कार सन्मान हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्याकडे असणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने २४ एप्रिल २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. या समितीमध्ये राज्यातील दिग्गज मंत्र्यांचा समावेश असून, अध्यक्ष म्हणून मा.जयकुमार रावल यांच्यावर मोठी जबाबदारी नमूद आहे. समितीच्या सदस्यांमध्ये ना. हसन मुश्रीफ, ना. दादाजी भुसे, ना. उदय सामंत, ना. पंकजा मुंडे, ना. अदिती तटकरे आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा समावेश आहे. ही समिती विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून योग्य नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करणार आहे.
जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी:
श्री.जयकुमार रावल यांच्या या नियुक्तीमुळे धुळे जिल्ह्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मिळालेला हा बहुमान जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक विकासासाठी सकारात्मक मानला जात आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले असून, रावल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

