धुळे पोलीस अधीक्षकपदी सिंगुरी विशाल आनंद आणि नंदुरबारला अश्विनी सानप

Screenshot

मुंबई दि.३० (द नरिमन पॅाईंट)राज्य गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करत भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या फेरबदलात उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी अश्विनी सानप यांची नंदुरबारच्या नवीन पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. अश्विनी सानप यापूर्वी लोहमार्ग पुणे येथे कार्यरत होत्या. तसेच, सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अमरावती (ग्रामीण) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांना आता नवीन पोलीस प्रमुख लाभले आहेत.

याच आदेशानुसार इतर अनेक जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि शहरांचे पोलीस उपायुक्तही बदलण्यात आले आहेत. यामध्ये अजय के. बन्सल यांची पोलीस अधीक्षक (सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य), बाळासाहेब पाटील यांची पोलीस उपायुक्त (मुंबई शहर), सोमनाथ घार्गे यांची सहायक पोलीस महानिरीक्षक (DGP कार्यालय, मुंबई), आणि रविंद्रसिंह एस. परदेशी यांची उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप घुगे यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून तर मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगरचे (अहमदनगर) पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. धोंडोतप एस. स्वामी आता नाशिक (ग्रामीण) चे नवे पोलीस अधीक्षक असतील.

पुणे आणि इतर विभागांतही महत्त्वाचे बदल झाले असून, अनुज मिलिंद तारे यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (पुणे) येथे तर निकेश खाटमोडे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. तेगबीर सिंह संधू यांची जालना, आयुष्य नोपानी यांची चंद्रपूर आणि पंकज कुमावत यांची परभणीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निकेतन कदमयांची अमरावती (ग्रामीण) येथे, राजकुमार शिंदे यांची लोहमार्ग पुणे येथे, तर गजानन राजमाने आणि अनुराग जैन यांची मुंबईत पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. सुरज गुंजाल यांची मालेगाव येथे तर दत्ता लक्ष्मण तोतेवाड यांची अमरावती येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. आगामी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आणि प्रशासकीय निकड लक्षात घेऊन हे आदेश निर्गमित करण्यात आले असून, सर्व अधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from THE NARIMAN POINT

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading