
इबोलाचा पहिला संशयित रुग्ण गुजरातमध्ये; नागपूरमधील एक प्रवासी आयसोलेशनमध्ये!
केंद्र सरकारने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत तातडीच्या बैठका घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई दि. (द नरिमन पॉईंट) : गुजरातमध्ये इबोलाचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. संपर्कातील तिघांना क्वारंटाइन करण्यात आले असून नागपूरमधील एका प्रवाशाला खबरदारी म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. देशात आरोग्य मंत्रालयाने तातडीच्या बैठका घेतल्या असून गुजरात सरकारने अहमदाबाद आणि सुरत येथे विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहेत. विमानतळांवर स्क्रिनिंग अधिक कडक करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोलाचा वाढता उद्रेक पाहता केंद्र सरकारने देशभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून, विशेषतः विमानमार्गे भारतात येणाऱ्या प्रवाशांमधून संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रासह सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत तातडीच्या बैठका घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विमानतळ, बंदरे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी ये-जा करणाऱ्या केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी कडक करण्यात आली आहे. विशेषतः काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य विभागाचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये इबोलाचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. काँगो देशातून मुंबईमार्गे वडोदऱ्यात आलेल्या ३७ वर्षीय उद्योगपतीला ताप आणि सर्दीसारखी लक्षणे जाणवल्यानंतर अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीसह त्याच्या संपर्कातील आणखी तीन जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. गुजरात सरकारने अहमदाबाद आणि सुरत येथे विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार केले असून विमानतळांवर स्क्रिनिंग अधिक कडक करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रफुल पानशेरिया यांनी अद्याप गुजरात किंवा भारतात इबोलाचा एकही निश्चित रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र शासनानेही या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा प्रशासन, महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य विभागाला विशेष सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने इबोलासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती तातडीने नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हानिहाय देखरेख सुरू करण्यात आली असून संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, विशेष रुग्णवाहिका, प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा सुविधा आणि संसर्ग नियंत्रण यंत्रणाही सज्ज ठेवण्यात येत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच सर्व राज्यांच्या आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी आणि विमानतळ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती, संशयित रुग्णांचे विलगीकरण, संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि उपचार पद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच इबोलाबाबत जनजागृती वाढवण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
इबोला हा अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य विषाणूजन्य आजार मानला जातो. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम, लाळ किंवा शरीरातील इतर द्रवांच्या संपर्कातून हा विषाणू पसरतो. ताप, तीव्र अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या, जुलाब आणि काही वेळा रक्तस्राव ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी ताप किंवा संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित सरकारी रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

