धुळे दि. २७ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील १८ लाख ५२ हजार ५४८ मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली आहे.
भारतीय संविधानातील कलम ३२४ व ३२६ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने २४ जून २०२५ रोजी मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) करण्याचे आदेश जारी केले आहेत. मागील अनेक वर्षांत राज्यात केवळ संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. वाढते शहरीकरण, स्थलांतर तसेच मतदार याद्यांमधील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा चुकीच्या नोंदी यामुळे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत विशेष सखोल पुनरीक्षणासाठी १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली असून २० ते २९ जून २०२६ या कालावधीत तयारी, प्रशिक्षण व छपाईची कामे केली जाणार आहेत. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. २९ जुलै २०२६ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार असून ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. दावे व हरकती ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येतील तर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात एक हजार ७५२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते घरोघरी भेट देऊन पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरित करतील आणि भरलेले अर्ज पुन्हा संकलित करतील. या प्रपत्रात मतदाराची सध्याची माहिती तसेच उपलब्ध असल्यास २००२-०४ मधील विशेष पुनरीक्षणातील जुनी नोंद समाविष्ट असेल. मतदारांना आवश्यक असल्यास स्वतःची माहिती अद्ययावत करण्याची तसेच नवीन छायाचित्र उपलब्ध करून देण्याची सुविधा असणार आहे. मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधा उपलब्ध असून आवश्यक माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. घर भेटीदरम्यान संबंधित कुटुंबीय घरी उपलब्ध नसल्यास मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किमान ३ वेळा भेट देणार आहेत. तरीही संपर्क होऊ न शकल्यास गणना प्रपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध राहणार असून त्याबाबतची सूचना संबंधित मतदारांना देण्यात येणार आहे.

